भरूच :कोरोनाच्या संकटात रुग्णालयांमध्ये होणाऱ्या विविध दुर्घटनांमध्येही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. गुजरातच्या भरूचमध्येही एका कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
गुजरातच्या भरूचमधील कोव्हिड रुग्णालयाला आग, 16 ठार - गुजरात
06:10 May 01
भरूचमधील कोव्हिड रुग्णालयाला आग, 16 ठार
आयसीयू विभागात लागली आग
याविषयी सविस्तर वृत्त असे की, भरूचमधील पटेल वेल्फेअर कोव्हिड रुग्णालयात रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयू विभागात ही आग लागली होती. या आगीत विभागात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 2 स्टाफ नर्सेसचाही यादरम्यान होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने इतर रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्दैवी घटना - ट्रस्टी
ही आमच्यासाठी आणि भरूचसाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने येथील रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. 14 रुग्ण आणि दोन स्टाफ नर्सचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे या रुग्णालयाचे ट्रस्टी झुबेर पटेल यांनी सांगितले.