नवी दिल्ली : कृषी कायद्यांवर चर्चेच्या मुद्द्यावरून बुधवारीही राज्यसभेत गदारोळ झाला. आम आदमी पक्षाच्या खासदारांनी सभापतींच्या बाकासमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आपच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आले. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेला अधिक वेळ देण्यास सदनात सदस्यांचे मतैक्य झाले.
आपचे तीन खासदार निलंबित
आपचे खासदार संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एन डी गुप्ता यांनी सदनात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी सभापती व्यंकय्या नायडूंनी त्यांना जागेवर बसण्यास सांगितले. मात्र खासदारांनी माघार न घेतल्याने सभापतींनी मार्शल्सना पाचारण केले. या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मंगळवारी राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे आता बुधवारच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर बुधवारीही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गदारोळ झाला.