जोधपूर -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 100 पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत देशभरात सभा घेत आहेत. शुक्रवारी टिकैत यांनी जोधपूरमध्ये शेतकरी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच आंदोलन आगामी आठ महिनेही चालू राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारीत राहावे, असे ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नसून शेतकरी आंदोलनाची लढाई आगामी आठ महिनेही चालू राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी आठ महिन्यांची व्यवस्था करून ठेवावी. आंदोलनाशी दिशा योग्य आहे. सरकार चर्चा करत नाही. त्यामुळे आम्ही गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत, असे टिकैत म्हणाले.
बंगालमधील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही तिथेही जाणार आहोत. तेथील शेतकऱ्यांना देखील एमएसपीचा लाभ मिळत नाही. भाजपाला मतदान करू नका, असे आवाहन आम्ही त्यांना करणार आहोत, असे टिकैत यांनी सांगितले. मोदी सरकारला घाबरून काही नेते शेतकरी आंदोलनाला समर्थन देत नसल्याचेही ते म्हणाले. देशातील सरकार ही फक्त दोन लोकांची सरकार आहे. ही सरकार कोणाचा सल्ला घेत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.