न्यूयॉर्क : 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान एका पॉर्न अभिनेत्रीला गुपचूप पैसे दिल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यांचा त्रास कमी होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने आरोप लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आज मॅनहॅटन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्हेगारी आरोपाचा सामना करणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. यासोबतच 2024 मध्ये पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावताना दिसत आहे.
रिसॉर्टमध्ये परतण्याची त्यांची योजना : त्यांच्या कार्यालयाने रविवारी सांगितले होते की, 76 वर्षीय ट्रम्प सोमवारी त्यांच्या मार-ए-लागो घरातून न्यूयॉर्क सिटीला जाण्याची अपेक्षा आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर फ्लोरिडा येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये परतण्याची त्यांची योजना आहे, तेथे ते मंगळवारी रात्री समर्थकांना संबोधित करतील. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, मी सोमवारी दुपारी १२ वाजता मार-ए-लागो येथून निघून न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरवर जाणार आहे. मंगळवारी सकाळी मी कोर्टात जात आहे.