सुरत (गुजरात)- देशात जागतिक दर्जाचे 75 रेल्वे स्थानके बांधली जाणार आहेत. काश्मीर खोऱ्यापर्यंत उत्तमोत्तम रेल्वे सेवा मिळावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. आम्ही हे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करू, जेणेकरून भारताच्या विकाम कामांमध्ये रेल्वे गेम चेंजर ठरले, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरूच आहे. 2024 पर्यंत अहमदाबाद ते उमरगामपर्यंत बुलेट ट्रेनसाठीच्या पायाभूत सुविधा पूर्ण होतील, असा विश्वास जरदोश यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित करताना व्यक्त केला. आणखी काय बोलल्या दर्शना जरदोश वाचा सविस्तर...
प्रश्न - जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नेमके काय पाऊले उचलली जात आहेत व सुरुवातीला देशातील किती शहरांमध्ये जागतिक दर्जाची स्थानके बांधली जातील..?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही अनेक संकल्प केले आहेत. रेल्वे ही आपली जीवनवाहिनी आहे. ते पुढे नेण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण याला नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपणही काहीतरी नवीन करायचे, असा निर्धार रेल्वेच्या अधिकाऱ्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी केला आहे. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन हे पंतप्रधान मोदी यांचे एक स्वप्न आहे.
यापैकी गांधीनगर पहिले रेल्वे स्थानक आहे. त्यावर पंचतारांकित हॉटेलही बांधण्यात आले असून हे पीपीपी तत्त्वावर (सार्वजनिक-खासगी भागीदारी) चालविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आयआरसीटीसीद्वारे देशभरात तब्बल 75 रेल्वे स्थानक पीपीपी तत्वावर जागतिक दर्जाचे बांधण्याची नियोजन सुरू आहे. प्रत्येक राज्यातील मोठ्या स्थानकात ज्या ठिकाणी रेल्वेची मोठी जागा असेत त्या ठिकाणी पीपीपी तत्वावर जागतिक रेल्वे स्थानकाचे निर्माण करण्याचे काम रेल्वे मंत्रालयामार्फत करण्यात येईल.
प्रश्न - सध्या मंत्रालयाचे लक्ष पायाभूत सुविधांवर आहे. देशाला कोणत्या प्रकारच्या पायाभूत सुविधांची गरज असेल, भविष्यात यासाठी कसे काम करण्यात येईल..?
उत्तर- प्रवासी व माल वाहतूक योग्य पद्धतीने व गतीशील व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून काम सुरू आहे. रेल्वे रुळांच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वेसह देशाच्या विकासाला चालना मिळू शकेल. रेल-टेलच्या माध्यमातून रेल्वे रुळाखालून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. जेणेकरुन जो लोकोपायलट आहे त्याचा त्रास कमी करता येईल. अनेक राज्यात ही कामे गतीशील सुरू आहेत.
प्रश्न - जमीनीखाली केबलचे काम कसे होईल..?
उत्तर- ज्यावेळी रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असेल, त्याचवेळी जमीनीखाली केबल टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या केबलच्या माध्यमातून सिग्लनही सुरू होईल. अनेक ठिकाणी मानवरहीत फाटक सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी गावे, शहरे येतात अशा अनेक ठिकाणी उड्डाणपूलची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर अशा ठिकाणचे अपघात कशाप्रकारे रोखता येईल याकडे लक्ष देऊन त्या पद्धतीने काम सुरू आहे.
प्रश्न - पूर्वीच्या सरकारकडून रेल्वेच्या पायाभूत सुविधेसाठी काम करण्यात कमी पडली आहे का, आपण हे आहात..?
उत्तर- काम झाले पण त्याचा कालावधी खूप मोठा होता व कामाची गती खूप सावकाश होती. आज आपल्याकडे एक लक्ष्य समोर ठेऊन काम करणारे लोक आहेत. जिथे पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प सुरू आहेत, ते कधी पूर्ण होईल याचीही एक कालमर्यादा ठरलेली आहे. त्यानुसार संपूर्ण नियोजन करुन काम करता येते.
प्रश्न - कोरोना काळापासून अनेक रेल्वे रुळावर धावत नाहीत, पूर्वी रेल्वेकडून तिकीट दरात प्रवाशांसाठी काही सवलत देण्यात येत होती, ती सवलत प्रवाशांना पुन्हा कधीपासून मिळणार..?
उत्तर- कोरोना काळात फक्त रेल्वेच सुरू होती. रेल्वेकडून ऑक्सीजनची वाहतूक करण्यात आली. पीपीई कीट, औषधे, जेवणाचीही वाहतूक रेल्वेकडून करण्यात आली. इतकेच नाही तर देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मुळगावी पोहोचविण्यासाठीही रेल्वे धावली. पण, आता लसीकरण महत्त्वाचे आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून त्यांच्या कुटुंबियांचेही लसीकरण सुरू आहे. मात्र, स्टेशनवर कुठेही हालचाल होत असेल तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही काही ठिकाणी सूट देण्यात आलेली नाही. कारण त्या ठिकाणी रुग्णससंख्या जास्त आहेत. राज्य सरकारने राज्य सरकारकडून लसीकरणाचे स्वतःचे लक्ष्य निश्चित केले आहे. दिवाळीपूर्वीच अनेक गाड्या तेथे सुरू झाल्या आहेत.
प्रश्न - रेल्वे स्थानकावर नेहमीच जास्त गर्दी दिसून येते, सध्याचे सरकार सुरक्षेबाबत संवेदनशील आहे, तर मंत्रालय या रेल्वे स्थानक परिसरात विशेषत: हायटेक सुरक्षा कशी पुरवू शकते..?
उत्तर- सर्व रेल्व स्थानकात आरपीएफ जवान व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहायाने लक्ष ठेवण्यात येते. रेल्वे स्थानकातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांच्या नातेवाईकांचे जास्त येणे-जाणे असते, त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीटावरुन गर्दीचा अंदाज येतो. स्थानकातील गर्दी कशापद्धतीने कमी करता येईल याकडे लक्ष देण्यात येते. आपल्या ठरलेल्या वेळेत रेल्वे कशापद्धतीने धावू शकेल हे आमचे प्रथम प्राधान्य आहे.
प्रश्न - मोदींनी बुलेट ट्रेनची जाबाबदारीही दिली आहे, दोन राज्यांमध्ये बुलेट ट्रेन धावावी, अशी मोदींची इच्छा आहे, गुजरातकडून बुलेट ट्रेनचे काम चांगल्या गतीने सुरू आहे, पण महाराष्ट्रमध्ये यासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहे, आपण हे अडथळे दूर करुन कसे काम पूर्ण कराल..?
उत्तर- विकासाचे काम सर्वांनाच आवडते. पर्यावरणाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी खूप चर्चा सुरू होती. आमचे दुसरे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी यासाठी खूप प्रयत्न केले. ज्याप्रमाणे अहमदाबाद ते उमरगाम ज्या गतीने काम होणे गरजेचे होते, त्या गतीने बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत अधिकारी क्षेत्रावर चर्चा सुरू आहे. 2024 पूर्वी अहमदाबादपासून सुरू होणारा गुजरातमधील जो भाग आहे, निदान त्या ठिकाणी बुलेट ट्रेनसाठीच्या पायाभूत सुविधेचे काम पूर्ण होईल.