ग्वाल्हेर -मध्य प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ( Economic Offences Wing ) ग्वाल्हेर मध्ये कारवाई करत एका सरकारी प्राथमिक शाळेच्या सहायक शिक्षक घरी छापा टाकला. चार ठिकाणी मारलेल्या छापेमारीत शिक्षकाकडे सुमारे एक हजार पटीच्या जास्त संपत्ती आढळून आली. पोलिसांनी ती संपत्ती जप्त केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 26 मार्च) उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपात सरकारी प्राथमिक शाळेच्या सहायक शिक्षकाच्या घरी छापा टाकला. पडताळणी केल्यानंतर तो तब्बल 20 महाविद्यालयाचा मालक असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक सतीश चतुर्वेदी यांनी दिली.
काय आहे प्रकरण -ग्वाल्हेर येथे राहणाऱ्या सहायक शिक्षक प्रशांत परमार यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या ( EOW ) पथकाने छापेमारी केली होती. सहायक शिक्षकाशी संबंधित असलेल्या 4 ठिकाणी एकाचवेळी पथकाने कारवाई केली. छापेमारीत शिक्षकाकडे उत्पन्नापेक्षा तब्बल एक हजार पटीने जास्त मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. सत्यम टॉवरमध्ये राहणाऱ्या शिक्षकाकडे उत्पन्नपेक्षा जास्त संपत्ती असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली ( gwalior primary teacher eow raid ) आहे. शिक्षकाच्या घरातून मोठ्या प्रमाणात चेक बूक व मालमत्तेचे दस्तऐवज मिळाले आहेत.