श्रीनगर - आज सकाळी शोपीयन प्रांतातील कुटपोरा भागात चकमक झाली. काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल एकत्रितपणे या कारवाईमध्ये सहभागी झाले आहे. काही दिवसात बर्फवृष्टीला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर काश्मीरमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी आहेत. बीएसएफच्या माहितीनुसार नियंत्रण रेषेच्या परिसरात २५० ते ३०० घुसघोर दबा धरून बसलेले आहेत.
जम्मू काश्मीरच्या शोपीयन प्रांतात चकमक
काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल यांची संयुक्तपणे शोपीयनच्या कुटपोरामध्ये कारवाई सुरू आहे. आज सकाळी त्यांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.
८ नोव्हेंबरला मचीलमध्ये झालेल्या चकमकीमध्ये चार लष्कराचे चार जवानांना वीरमरण आले होते तर, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मध्यरात्री हे दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दोन एके-४७ रायफल, एक पिस्तूल, एक रेडीओ सेट आणि ५० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
भारत-पाक दरम्यान असलेल्या नियंत्रण रेषेच्या परिसरात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहे. त्यांचा सामना करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे(बीएसएफ) अतिरिक्त संचालक सुरिंदर पवार यांनी सांगितले आहे.