नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे सकाळी आठ वाजल्यापासून समजण्यास सुरुवात होईल. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता टिकविण्याचं काँग्रेससमोर आव्हान आहे. तर मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता टिकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणात भारत राष्ट्र समितीची (BRS) सत्ता आहे. केसीआर सलग तिसऱ्यांदा विजयी होणार का, याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष असे तेलंगणातील निवडणुकीचे चित्र आहे.
Live Updates:
- राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभाव झाला आहे. यामुळं अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे.
- तेलंगाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यामागे काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते माणिकराव ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता. माणिकराव ठाकरे हे तेलंगाणाचे काँग्रेस प्रभारी होते. या विजयानंतर ठाकरे यांनी ईटीव्ही भारतसोबत खास संवाद साधला. त्यांनी तेलंगाणातील जनतेचे आभार मानले. संपूर्ण नेत्यांनी युनिटी दाखवली यामुळे हा विजय शक्य झाल्याचे ते म्हणाले.
- के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. तेलंगाणात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर लगेच केसीआर यांनी राजीनामा दिला. केसीआर यांना राज्यात मोठा धक्का बसला आहे.
- चार राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सर्व जनतेचे आभार मानले आहेत. खास करुन महिला, युवती आणि नवीन मतदारांचे मोदींनी विशेष आभार मानले.
- पाच राज्यांतील ही निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीची तालीम होती. संपूर्ण देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. आम्हाला तीन राज्यांत चांगले बहुमत मिळेल याची खात्री होती. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये चांगले निकाल हाती आले. पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची 100% खात्री आहे आणि येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा अपमान करणाऱ्या इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांना धडा शिकवण्याची योजना आम्ही आखली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निकालानंतर दिली.
- प्रिय बीआरएस परिवार, सर्व कठोर परिश्रमांबद्दल धन्यवाद! तुम्ही दिलेल्या लढ्यासाठी तसेच सर्व सोशल मीडिया योद्ध्यांचे विशेष आभार! आम्हाला विसरू नका.. सत्तेत असताना किंवा नसतानाही आम्ही जनतेचे सेवक आहोत. सर्व विजयी आमदारांचे आणि काँग्रेस पक्षाचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया बीआरएस आमदार के कविता यांनी ट्विटवर दिली.
- राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची निवडणुकीतील मेहनत नाकारता येणार नाही. मोदी- शहा यांच्याबरोबर तपास यंत्रणांचे देखील अभिनंदन केले पाहिजे, अशी मिश्किल प्रतिक्रिया संजय राऊत यांनी निकालावर दिली.
- जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे. लोकांचा सरकारवर भरोसा आहे की नाही लोकसभेला कळेल. भाजपा हिंदू, मुस्लिमवर राजकारण करतं. महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करण्याचं काम सरकार करत आहे. काँग्रेस खुर्चीपेक्षा विचाराला जास्त महत्त्व देते. जनता काँग्रेसला सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही. पनौती शब्द भाजपासाठी लखलाभ झाला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निकालावर दिली.
- मध्य प्रदेशात सत्ताविरोधी लाट नव्हती, तर सत्तापक्ष समर्थन लाट होती, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
- तेलंगाणात काँग्रेसने मोठी विजयी आघाडी घेतली आहे. आता मुख्यमंत्री पदासाठी नावं समोर येत आहेत. अशात काँग्रेसचे तेलंगाणा अध्यक्ष रेवांथ रेड्डी यांचंही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. त्यामुळं त्यांच्या घराच्या सुरक्षेत लगेच वाढ करण्यात आली आहे.
- आता घर घर मे नाही तर 'मन मन मे मोदी' असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चार राज्यांच्या निकालानंतर दिली आहे.
- मध्य प्रदेशमध्ये पुन्हा भाजपाची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही मिठाई खाऊ घातली आहे.
- राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पूनावाला यांनी म्हटले की, सर्वप्रथम, मी तेलंगणाच्या निवडणुका जिंकल्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करतो. परंतु काँग्रेसचा छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पराभव का झाला, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जर आपण मध्य प्रदेशकडे पाहिले तर शिवराजसिंह चौहान हे ओबीसी मुख्यमंत्री आहेत.
-
राजस्थानमध्ये भाजपाची ११४ तर काँग्रेसची ७० जागावर आघाडी आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाची ५३ तर काँग्रेसची ३५ जागावर आघाडी आहे. तेलंगाणामध्ये बीआरएसची ३८ तर काँग्रेसची ६५ जागावर आघाडी आहे.
-
विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक बोलाविली आहे. राजस्थानमध्ये नवीन सरकार देण्याचा जनतेचा मूड दिसून येतो. बीआरएसचे स्वत:च्या राज्याकडं दुर्लक्ष झालं. राहुल गांधींच्या भारत यात्रेचा काँग्रेसला फायदा झाला. ईव्हीएमबाबत लगेच बोलता येणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
- राजस्थानमध्ये वसुंधरा राजे विजयी झाल्या आहेत. चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपा आघाडीवर आहे.
-
मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपाचे दातिया येथील उमेदवार नरोत्तम मिश्रा हे तिसर्या फेरीच्या मतमोजणीनंतर २९५० मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. त्यांना एकूण १८९५५ मते मिळाली आहेत.
-
भाजपानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसंडी मारली आहे. यावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, जेव्हा काँग्रेस पक्ष हरतो तेव्हा ईव्हीएमला दोष देण्यात येतो. जेव्हा विरोधी पक्ष जिंकतात, तेव्हा भाजपाची धोरणे वाईट होती, असं म्हटलं जाते. भाजपाचा विजय हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा, भाजपाच्या विचारसरणीचा आणि धोरणांचा विजय आहे.
- निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार तेलंगणामध्ये काँग्रेस 119 पैकी 68 जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत हैदराबादमधील सीएम कॅम्प ऑफिस येथं शुकशुकाट आहे. मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव सध्या मुख्यमंत्री निवासस्थानात आहेत.
- केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अश्विनी वैष्णव म्हणाले की, मध्य प्रदेशात भाजपचा मोठा विजय आहे. भाजप सरकारने काम केले असून जनतेचा डबल इंजिन सरकार, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कामगिरीवर विश्वास आहे. मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि सर्वांचे अभिनंदन करतो.
- तेलंगाणाचे काँग्रेसचे खासदार उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की, तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करेल. तेलंगणातील जनतेच्या हृदयात गांधी कुटुंबासाठी खास स्थान आहे. 2014 आणि 2018 च्या निवडणुकीत आम्ही चूक केली होती. यावेळी आम्ही स्वतःला दुरुस्त केल्यानं विजयाच्या वाटेवर आहोत. दुसरे म्हणजे बीआरएस सरकारचा नालायकपणा, अहंकार, भ्रष्टाचार हादेखील काँग्रेसच्या विजयाला कारणीभूत ठरला.
- तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे खासदार राहुल गांधी आणि राज्य पक्षाचे प्रमुख रेवंत रेड्डी या पोस्टरवर दूध ओतले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार तेलंगणातील एकूण 119 जागांपैकी 57 जागांवर आघाडीवर आहे.
- मध्य प्रदेशमध्ये भाजपा आघाडीवर आहे. त्याबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या मनात खासदार आहेत. तर खासदारांच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत. मोदींनी जाहीर सभा घेऊन लोकांना आवाहन केल्यानं चांगला परिणाम झाला आहे. डबल इंजिन सरकारनं केंद्र सरकारच्या योजनांची योग्य अंमलबजावणी केल्या आहेत. लोकांचे आमच्यावर प्रेम असल्यानं भाजपला आरामात भव्य बहुमत मिळेल असे मी यापूर्वीही म्हटले होते. हेच आज सर्वत्र दिसत आहे.
- चार राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागत असताना काँग्रेसने 6 डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची पुढील बैठक बोलावली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोन केला आहे.
- हैदराबादच्या ताज कृष्णा समोर खासगी बस तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबत तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरण कुमार चमला म्हणाले की, तुम्हाला केसीआर यांची कार्यशैली माहित आहे. घोडेबाजार करणं हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. आमच्याकडे किमान ८० हून अधिक जागा असणार आहेत. त्यामुळे आज आम्ही खूप आनंदी आहोत.
- काँग्रेसची तेलंगणात आघाडी आहे. अशा स्थितीत बीआरएस नेते काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत का, असे विचारले असता काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या की, हो, बीआरएस आमच्या संपर्कात आहेत. कधी बीआरएसचे नेते आमचे आमदार घेऊन जातात, तर कधी त्यांचे आमदार काँग्रेसमध्ये येतात.
- केंद्रीय मंत्री आणि भाजपा पक्षाचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया म्हणतात, आमच्या डबल इंजिन सरकारच्या लोककल्याणकारी योजना पाहता आमच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहे. आम्ही पूर्ण बहुमताने मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वास आहे.
- राजस्थानमध्ये भाजपा ८५ जागावर तर काँग्रेस ६९ जागावर आघाडी आहे. तर २ जागावर इतर उमेदवार आघाडीवर आहेत. तर छत्तीसगडमध्ये भाजपा ३१ जागावर तर काँग्रेस दोन जागावर आघाडी आहे. तेलंगाणामध्ये बीआरएस ३४ जागावर तर काँग्रेस ५२ जागावर आघाडीवर आहे. भाजपा ७ तर एमआयएम १ जागेवर आघाडी आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा १२६ जागावर तर काँग्रेस ५१ जागावर आघाडीवर आहे.
- तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस-3 जागावर तर काँग्रेस-2 जागावर आघाडीवर आहे.
- निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार किशन पोल मतदारसंघातील राजस्थान काँग्रेसचे आमदार उमेदवार अमीन कागदी हे आघाडीवर आहेत.
- तेलंगणा बीआरएसच्या आमदार के कविता या हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानातून सीएम कॅम्प ऑफिसकडे रवाना झाल्या आहेत. त्या तेथून राज्यातील मतमोजणीबाबत अपडेट घेणार आहेत.
- हैदराबादच्या जुबली हिल्समधील काँग्रेसचे आमदार उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन कोटला हे विजय भास्कर रेड्डी इनडोअर स्टेडियममधील निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राकडे रवाना झाले आहेत.
- मतमोजणी करण्याकरिता मध्य प्रदेशातील मुरैना येथील मतमोजणी केंद्रात विटांनी बांधलेली ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आहे.
- राजस्थानमध्ये भाजपा १५ जागांवर तर काँग्रेस ९ जागावर आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपा १९ जागावर आघाडी आहे. तर भाजपा ५ जागावर असून मतमोजणीत मागे आहे.
- तेलंगणात मतमोजणी सुरू असताना काँग्रेसचे तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, राज्यात आम्हाला ७० हून अधिक जागा मिळणार आहेत. एक्झिटपोल देखील हाच अंदाज वर्तविला आहे.छत्तीसगडचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट केले की, मतमोजणी हा लोकांच्या आदेशाचा दिवस आहे. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, आमच्या अपेक्षांपेक्षा निवडणुकीचे निकाल चांगले असणार आहेत. आम्ही राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्ता मिळविणार आहोत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, मध्य प्रदेशमध्ये आम्हाला 130 जागा मिळणार आहेत.
- राजस्थानमध्ये भाजापा तीन जागावर तर काँग्रेस दोन जागावर आघाडीवर आहे. तर छत्तीसगडमध्ये भाजपा एका जागेवर तर काँग्रेस २ जागावर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा ९ जागावर तर काँग्रेस २ जागावर आघाडी आहे.
- चार राज्यांच्या निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठा उत्साह दिसून येत आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर संगीताचे कार्यक्रम सुरू आहे. पक्षाला विजय मिळेल, असा काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास आहे. विजयानंतर आनंद साजरा करण्याकरिता दिल्लीच्या मुख्यालयात लाडू आणण्यात आले आहेत.
- छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील स्ट्रॉँग रुम या निवडणूक अधिकाऱ्यांनी उघडल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
- मतमोजणीपूर्वीच भोपाळमधील प्रदेश पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेस उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
- तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार असल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी पोस्टल मतपत्रिका वारंगलमधील मतमोजणी केंद्रात आणल्या आहेत.
- विरोधी पक्षांची आघाडी (इंडिया ) आणि एनडीए यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही आघाड्याकडून देशात सत्ता येणार असल्याचा दावा केला जात आहे.
- मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सत्ता टिकविण्याच आव्हानं पेलवावे लागणार आहे. तर दुसरीकडं काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानच्या निवडणुकीत यश मिळवून हिंदी भाषिक राज्यांवर पुन्हा पकड मिळवायची आहे. राजस्थानमध्ये दरवेळेस सत्तापालट होत असताना काँग्रेसला यश मिळविणं मोठे आव्हानात्मक असणार आहे.