नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. या सोबतच आयोगाने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
राष्ट्रवादी या राज्यात राज्य पक्ष : आयोगाने म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस यांना अनुक्रमे नागालँड आणि मेघालयमध्ये राज्य पक्ष म्हणून ओळखले जाईल. आयोगाने नागालँडमधील लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), मेघालयमध्ये व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी आणि त्रिपुरामधील टिपरा मोथा यांना 'मान्यताप्राप्त राज्य राजकीय पक्ष'चा दर्जा दिला आहे.
'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा : निवडणूक आयोगाने जुलै 2019 मध्ये या तिन्ही पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावत लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या कामगिरीनंतर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का रद्द केला जाऊ नये, हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. आयोगाने म्हटले आहे की, दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. आम आदमी पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आहे. मार्चमध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांना 6.77 टक्के मते मिळाली होती. तसेच गेल्या वर्षी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही आपने 5 जागा जिंकल्या होत्या.