नवी दिल्ली : दिल्ली - एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी रात्री 9.34 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू - काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले.
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात धक्के जाणवले : दिल्ली, नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम, गाझियाबादसह आसपासच्या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या सोबतच उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही भागांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. भूकंपाचे हादरे फार तीव्र नव्हते, मात्र भूकंप झाला आहे असे जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. भूकंपाची बातमी ऐकून मनात भीती निर्माण झाल्याचेही लोकांनी सांगितले.
मी घरात टीव्ही पाहत होतो. तेव्हा अचानक खुर्ची हलू लागली. पण हा भूकंप होता हे मला कळले नाही. बातमीत पाहिल्यानंतर कळले की दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यानंतर मी घाबरून घराबाहेर पडलो. - स्थानिक नागरिक