नवी दिल्ली :जयपूरमध्ये भूकंपाच्या हादऱ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जयपूरमध्ये अर्ध्या तासात भूकंपाचे तीन धक्के बसल्याने प्रशासनाचीही मोठी डोकेदुखी वाढली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या अहवालात शुक्रवारी सकाळी 04.25 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे मणिपूरमध्येही भूकंप झाल्याची नोंद आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार जयपूरमध्ये भूकंपाचा पहिला धक्का 03.4 तीव्रतेचा झाला आहे. हा भूकंप पहाटे 4.09 च्या सुमारास झाल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरा धक्का 03.1 तीव्रतेचा भूकंप सकाळी 04.22 वाजता झाला. तर भूकंपाचा तिसरा धक्का 04.25 वाजता झाला असून तो 3.4 तीव्रतेचा असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केले आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, शेवटचे वृत्त येईपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यावर प्रतिक्रिया देताना राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यासह इतर ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जयपूर आणि लोक सुरक्षित असल्याची आशा व्यक्त केली. जयपूरमधील स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर काही ठिकाणी रस्त्यावर जमलेल्या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे.