चंडीगड (हरियाणा) - पुष्पा निवास... रचना निवास... सानिया निवास... मनीषा निवास... नीशूचं घर ... संध्याचं घर अशी या मुलींच्या घरांची नावे आहेत. हे देशातलं असं पहिलं गाव जिथलं प्रत्येक घर घरातल्या मुलींच्या नावानं ओळखलं जातं. किरूरी असे या गावाचे नाव आहे.
देशातील असे पहिले गाव, जिथे प्रत्येक घर मुलीच्या नावाने ओळखले जाते 'आता मुलीही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. मुली आता सगळ्याच क्षेत्रांत पुढे चालल्यात. त्यांचीही आता वेगळी ओळख असेल. त्यांच्या नावाने आता घरावर नावाच्या पाट्या लावल्या आहेत. म्हणजे आता मुलीही घराचा वारसा चालवू शकतात,' असे येथे राहणाऱ्या वंदनाने सांगितले आहे.
खरोखरच हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातलं किरूरी गाव आता सामान्य राहिलं नाही.. तर त्याची एक खास ओळख बनलीये.. एकीकडं जिथं आपल्या समाजात 'मुलगी म्हणजे परक्याचं धन' अशी मानसिकता आहे. त्याच काळात हरियाणातल्या या छोट्याशा गावानं संपूर्ण समाजाला आरसा दाखवण्यासाठी एक जबरदस्त कल्पना राबवलीये... जी मुलींचा सन्मान करणारी आहे. जवळजवळ 1200 बाराशेची लोकसंख्या असलेलं हे संपूर्ण गाव मुलींना समर्पित आहे..
'सगळे खूप छान चाललेय. लेकींच्या नावांच्या नेमप्लेट लागल्या आहेत. आमच्या गावाची भारतात ओळख निर्माण झाली आहे ही आनंदाची बाब आहे,' असे येथील ग्रामस्थ महेंद्र सांगतात.
या अभियानामागं एक सुंदर आणि प्रगतिशील विचार
या अभियानामागं एक सुंदर आणि प्रगतिशील विचारही आहे. 'सेल्फी विथ डॉटर अभियाना'मुळं चर्चेत आलेले हरियाणातले माजी सरपंच सुनील जागलान यांनीच या गावात 'लाडो स्वाभिमान अभियान' म्हणजेच 'लाडकी स्वाभिमान अभियाना'ला सुरुवात केली. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींनाही वाटा असण्याचा अधिकार आहे, ही बाब समाज सहजासहजी मान्य करत नाही. मात्र, त्याच वडिलांनी आपल्या घराला मुलीच्या नावानं ओळख दिली, तर लोकांची मानसिकता बदलेल, असा त्यांचा हेतू आहे.
'देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाल्यनंतरही मुलींना घरच्या मालमत्तेत कायद्यानुसार वाटा मिळत नाही. 'लाडो स्वाभिमान उत्सव' मुलींना राजकीय, समाजिक, आर्थिक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यांचा हक्क देण्यासाठी आहे,' असे जागलान यांनी सांगत जागलान यांनी अभियानामागचा हेतू सांगितला.