भुवनेश्वर (ओडिशा) Paused Missile Testing To Save Turtle :भारताची संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO) ने ओडिशाच्या किनारपट्टीवरील व्हीलर बेटावर क्षेपणास्त्र चाचणी तात्पुरती थांबवली आहे. पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान, ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचा घरटे बांधण्याच्या हंगाम असतो. त्यामुळे या कासवांचं संरक्षण करण्यासाठी डीआरडीओनं हा निर्णय घेतला आहे.
क्षेपणास्त्र चाचणीमुळे कासवांना होतो त्रास : ओडिशाचे मुख्य सचिव पी के जेना यांनी हा निर्णय जाहीर केला. क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान विजेसारख्या चमकदार प्रकाशामुळे आणि मोठ्या आवाजामुळे कासवांचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्यांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी डीआरडीओनं किनारपट्टीवरील क्षेपणास्त्र चाचणी तात्पुरती थांबवली आहे. या वर्षी सुमारे पाच लाख ऑलिव्ह रिडलेंनी या भागात घरटी बांधली आहेत.
सैन्य आणि तटरक्षक दल गस्त घालतील : मुख्य सचिव पी के जेना यांच्या नेतृत्वाखालील समितीनं, किनारपट्टीवरील विविध संस्था आणि उद्योगांना यांचं संरक्षण करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांची प्रजाती दुर्मीळ श्रेणीत येते, जी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या कासवांची अंडी आणि कवच विविध कारणांसाठी वापरली जातात. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होते. याशिवाय कासव अंडी घालतात त्या ठिकाणी ट्रॉलर आणि मासेमारी नौकांना जाण्यापासून रोखण्यासाठी सैन्य आणि तटरक्षक दल गस्त घालणार आहे.
मासेमारीवर बंदी : वन्यजीव विभागानं बालासोरमधील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंज (ITR) च्या संचालकांना व्हीलर बेटाच्या परिघाबाहेर मोसमी वन शिबिरं उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. याचा वापर करून सागरी पोलीस वनविभागासोबत मिळून गस्त घालतील. गंजम जिल्ह्यातील रुषिकुल्या रुरकी येथे सुमारे ६.६ लाख समुद्री कासवं घरटी बांधतात. ओडिशा सरकारनं १ नोव्हेंबर ते ३१ मे पर्यंत किनारपट्टीच्या त्या भागात मासेमारीवर आधीच बंदी घातली आहे.
हेही वाचा :
- वाघाचा महाराष्ट्र ते ओडिशा प्रवास; चार राज्यं केली पार