नवी दिल्ली:डीआरडीओच्या कॉर्नर शॉट वेपन सिस्टममुळे सशस्त्र लक्ष्य पाहणे आणि त्यावर हल्ला करणे सैनिकांना सोपे होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) नुसार, CSWS दोन प्रकारांमध्ये विकसित केले जात आहे. या शस्त्राच्या मदतीने, सुरक्षा दलांना, सैनिकांना शत्रूच्या प्रत्युत्तराची भीती न बाळगता हल्ला करता येणार आहे. कॉर्नर शॉट वेपन सिस्टम (CSWS) मध्ये 9 मिमी पिस्तूल आणि 40 मिमी अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर बसविण्यात येणार आहे. पिस्तूल आणि ग्रेनेड लाँचर सीएसडब्ल्यूएसच्या दोन भिन्न आवृत्त्या असतील. DRDO CSWS ला दिवसा आणि रात्रीच्या कॅमेऱ्यांनी सुसज्ज करत आहे.
अनेक अत्याधुनिक फीचर्स : CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना कॉर्नर शॉट वेपन सिस्टम देण्याची तयारी सुरू आहे. सुरक्षा दलांच्या प्रभावी कारवाईसाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक CSWS मध्ये अदृश्य लेझर, लेझर लक्ष्यीकरण उपकरणे, रणनीतिक टॉर्च, रंगीत एलसीडी मॉनिटर आणि रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी बसवण्यात आली आहे. कॉर्नर शॉट वेपन सिस्टीम मार्च 2019 मध्ये तयार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांत, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने (CAPF) CSWS च्या अनेक वेळा चाचण्या घेतल्या आहेत. वृत्तानुसार, संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले आहे की, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि CRPF या दोघांनाही CSWS देण्यात येणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॉर्नर शॉट वेपन सिस्टम डेव्हलपमेंट आणि ट्रायल दरम्यान दोन उद्योगांना सहभागी करून घेण्यात आले होते. दोन्ही कंपन्यांनी DRDO ने दिलेल्या रचनेवर आधारित कॉर्नर शॉट वेपन सिस्टीम विकसित केली आणि त्यात कोणतीही कमतरता आढळली नाही. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक चाचण्या झाल्या आहेत आणि DRDO ने तयार केलेले CSWS निर्यातीसाठी तयार आहे.
दहा वर्षांपूर्वीच काम सुरु : CSWS विकासाचे काम दशकभरापूर्वी सुरू झाले. जुलै 2020 मध्ये, DRDO ने आपले तंत्रज्ञान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे सुपूर्द केले. पुणे येथील बीईएल व्यतिरिक्त हे तंत्रज्ञान हैदराबादमधील झेन टेक्नॉलॉजीलाही देण्यात आले. दोघेही CSWS चे उत्पादन करत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या धर्म गार्डियन 2022 मध्ये कॉर्नर शॉट वेपन सिस्टीमचा प्रयोग दाखवण्यात आला. कर्नाटकातील बेळगाव येथे भारत आणि जपान यांच्यातील धर्मा गार्डियन 2022 हा द्विपक्षीय लष्करी सराव 10 मार्च रोजी संपला. भारतीय सैनिकांनी जपानला CSWS तंत्रज्ञान समजावून सांगितले आणि खोलीत लपलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी दोघांनीही कॉर्नर शॉट वेपन सिस्टीमचा वापर केला.