कोपला (कर्नाटक) Donate Land To School : सर्वसाधारण लोक सतत संपत्ती जमा करण्याच्या आणि भविष्यासाठी बचत करण्याच्या चिंतेत असतात. मात्र कर्नाटकातील एका ६८ वर्षीय महिलेनं आपल्या गावातील मुलांना अभ्यास करता यावा यासाठी तिच्याकडे असलेलं सर्वस्व स्वेच्छेनं दान केलं.
कर्नाटक सरकारनं सन्मानित केलं : कोपला जिल्ह्यातल्या कुणकेरी गावातील रहिवासी हुच्चम्मा चौधरी यांनी निस्वार्थीपणा आणि समाजसेवेचा आदर्श घालून दिलाय. त्यांना कर्नाटक सरकारनं नुकतंच समाजसेवेतील राज्योत्सव पुरस्कारानं सन्मानित केलं. राज्य सरकारकडून दरवर्षी दिला जाणारा हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हुच्चम्मा यांनी कुणकेरी येथील त्यांची दोन एकर मालकीची जमीन शाळेसाठी दान केली. जेणेकरून गावातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. ही महिला आता त्याच शाळेत माध्यान्ह भोजनासाठी मुख्य स्वयंपाकी म्हणून काम करते.
शाळेसाठी दोन एकर जमीन दान केली : हुच्चम्मा काही दशकांपूर्वी कुणकेरी गावात लग्न करून आल्या होत्या. मात्र लग्नानंतपर त्यांना मूलबाळ झालं नाही. पतीच्या निधनानंतर हुच्चमांना एकाकी वाटायला लागलं. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्या आपल्या दोन एकर शेतात काम करत राहिल्या. दरम्यान, गावात शाळेची नवीन इमारत बांधायची होती. तेव्हा हुच्चम्मा यांनी त्यांच्या मालकीच्या एक एकर जमीन आनंदानं दान केली. काही वर्षांनंतर, शाळेला क्रीडांगणाची गरज भासली. त्यानंतर या मोठ्या मनाच्या महिलेनं तिची उरलेली जमीनही दान देऊन टाकली.
शाळेतील मुलांप्रती जबाबदारी वाटते : सध्या या शाळेत सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. हुच्चम्मा आता याच शाळेत माध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्याचं म्हणणं आहे की, शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी त्यांची मुलं आहेत आणि त्यांना त्यांच्याप्रती जबाबदारी वाटते. या भागात अलीकडे काही स्टीलचे कारखाने सुरू झालेत. हुच्चम्मा यांना त्यांच्या जमिनीद्वारे चांगली रक्कम मिळाली असती. मात्र त्याबद्दल त्यांना अजिबात खेद वाटत नाही. 'मला फक्त दोन वेळच्या जेवणाची गरज आहे', असं त्यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा :
- Married Women Cricket Tournament : कर्नाटकात विवाहित महिलांची क्रिकेट स्पर्धा; देशातील पहिलाच प्रयोग
- Chhattisgarh Election 2023 : तृतीय पंथीयांसाठी स्पेशल 'रेनबो मतदान केंद्र', निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम