चेन्नई :द्रविड मुन्नेत्रा काळगम (डीएमके) आमदार पी. सर्वनन यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाला रामराम ठोकला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मोदींवर विश्वास, म्हणून प्रवेश..
"सहा वर्षांपूर्वी मी भाजपाचा सदस्य होतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर मला विश्वास असल्यामुळे मी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश घेत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मी याबाबत विचार करत होतो, अखेर आज मी याबाबत पाऊल उचलले आहे" असे मत पी. सर्वनन यांनी व्यक्त केले.
लसीकरणावरुन मोदींवर स्तुतीसुमने..
"एक डॉक्टर असल्यामुळे कोरोनाच्या लसीबाबत मलाही चिंता वाटत होती. मात्र आज केवळ देशातीलच नाही, तर विदेशातील नागरिकांनाही भारतात बनवलेली कोरोना लस दिली जात आहे. मोदींच्या नेतृत्त्वकौशल्याचे हे उत्तम उदाहरण आहे" असेही ते यावेळी म्हणाले.
तिकीट न मिळाल्यामुळे राजीनाम्याच्या चर्चा..
१३ मार्चला डीएमकेने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये बऱ्याच विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, सर्वनन यांना तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर सर्वनन यांच्या समर्थकांनी मदुराईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. २०१९मध्ये तिरुअनंतपुरममधून सर्वनन निवडून आले होते. यावेळी मात्र ही जागा डीएमकेने सीपीआय (एम) या पक्षाला दिली आहे.
तामिळनाडूमध्ये सहा एप्रिलला मतदान पार पडणार आहे. दोन मे रोजी या निवडणुकांसाठी मतमोजणी पार पडेल.
हेही वाचा :तामिळनाडू विधानसभा निवडणूक : भाजपा लढवणार २० जागा