चेन्नई Diwali 2023 :दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. दरवर्षी देशभरात फटाके फोडून दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र तामिळनाडूतील काही गावांमध्ये पर्यावरणाच्या हितासाठी अत्यंत शांत वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येते.
गावाबाहेर जाऊन फटाके फोडतात : तमिळनाडू सरकारनं शिवगंगई जिल्ह्यातील वेतांगुडी गावाला १९७७ मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं. या अभयारण्यात परदेशातील २१७ हून अधिक जातींचे पक्षी वास्तव्य करतात. त्यामुळे वेतांगुडी आणि आसपासच्या पेरिया कोल्लुक्कुडी आणि चिन्ना कोल्लुक्कुडी या गावांतील लोकांनी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून दिवाळीत फटाके फोडलेले नाहीत. याबाबत पेरिया कोल्लुक्कुडी येथील रहिवासी चेल्लामनी यांनी सांगितलं की, इथले लोकच नाही तर मुलंही दिवाळीत फटाके फोडत नाहीत. "फटाके फोडायचे असल्यास आम्ही गावाबाहेर जाऊन फोडतो. गावात कोणीही फटाके फोडत नाही. हा पक्ष्यांचा प्रसुतीचा काळ असल्यानं फटाक्यांच्या आवाजानं पक्षी घाबरतात. म्हणून आम्ही फटाके फोडत नाही", असं त्यांनी सांगितलं.
पक्षांसाठी फटाके फोडत नाहीत : याशिवाय कोईम्बतूर जिल्ह्यातील किट्टमपालयम गावातील लोक गेल्या २० वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडत नाहीत. या संदर्भात किट्टमपालयमचे ग्रामस्थ म्हणाले, "आमचं गाव समृद्ध करण्यासाठी वृक्षारोपण करणं हा आमचा उद्देश आहे. आम्ही शक्य तेवढी झाडं लावतो. याशिवाय आम्ही आमच्या शहरात पक्ष्यांची पैदास करण्याचा निर्णय घेतला". ते पुढे म्हणाले की, "जेव्हा विविध भागातून विविध प्रकारची फळं खाणारे वटवाघुळं आणि पक्षी आमच्या गावात येतात, तेव्हा मागे राहिलेल्या बिया वाढून येथे वृक्ष बनतात. आमच्या गावात येणाऱ्या वटवाघुळांचे हे फायदे लक्षात आल्यानंतर २० वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला".