डेहराडून -उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडींनी वातावरण तापलं आहे. भाजपाकडून मुख्यमंत्री तीरथसिंह रावतांचा यांची गच्छंती करण्यात आली असून उत्तराखंडची कमान आता पुष्कर सिंह धामी यांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. शनिवारी पार पडलेल्या भाजपा आमदारांच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुष्कर सिंह हे उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री होतील. रविवारी सायंकाळी म्हणजे आज 5 वाजता राजभवनमध्ये राज्यपाल राणी मौर्य या पुष्कर सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पुष्कर सिंह म्हणाले, की पक्षातील बहुतेक नेते अनुभवी असल्याने काम करण्यात अडचण येणार नाही. पक्षातील सर्व नेत्यांचा सन्मान करतो. सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली मी कार्य करीन. कोरोनाच्या भीषण परिस्थितीतही आगामी विधानसभा निवडणूक पार पडेल आणि सहजतेने विजय मिळवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली कार्य पुढे नेईल आणि जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.
उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या घटनात्मक संकटात माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे शुक्रवारी रात्री उशीरा राजीनामा सोपवला. राजीनाम्याचे मुख्य कारण घटनात्मक संकट असल्याचे त्यांनी नमुद केले. पोटनिवडणुका घेणे निवडणूक आयोगाला अवघड आहे. त्यामुळे घटनात्मक संकट परिस्थिती लक्षात घेता, राजीनामा देणे योग्य वाटल्याचे ते म्हणाले.