नवी दिल्ली -अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut)अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शीख संघटनेने कंगना रणौतवर गुन्हा दाखल केला आहे. गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (DSGPC) दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनच्या सायबर सेलमध्ये कंगनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती.
कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर ही वादग्रस्त टिप्पणी केली आहे. कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाने लिहिले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी या खलिस्तानींना डासाप्रमाणे चिरडले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या प्राणाची किंमत मोजली पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. आजही त्यांच्या नावाने हे खालिस्तानी थरथर कापतात, त्यांना तशाच गुरूची गरज आहे. तसेच शुक्रवारी कायदे रद्द झाल्यानंतर ती म्हणाली होती की, "दुःखद आणि लज्जास्पद ...संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या ऐवजी रस्त्यावरील लोक जर कायदे करु लागले तर ते राष्ट्र जिहादी आहे. ज्यांना जे पाहिजे होते त्यांना ते मिळाले त्यांचे अभिनंदन."
कंगना राणौतच्या या वक्तव्यानंतर शीख समुदायात संतापाची लाट पसरली आहे. कंगना रणौत पद्मश्री पुरस्कारला पात्र नाही. कंगनाला मानसिक रुग्णालयात दाखल करावे किंवा तुरुंगात पाठवावे. कंगना जाणूनबुजून शिखांचा अपमान करण्यासाठी अशी टिप्पणी करत असते, असे दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले.