नवी दिल्ली :दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुडा आज सकाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस देऊन त्यांच्याकडून माहिती मागवली होती. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान महिलांच्या लैंगिक छळाबद्दल विधान केले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना एक प्रश्नावली पाठवली होती, जिची माहिती घेण्यासाठी विशेष सीपी राहुल गांधी यांच्या 12, तुघलक लेन येथील निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी राहुल गांधी यांचे म्हणणे नोंदवून घेतले नाही. पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस दिली आणि घरातून परतले.
राहुल गांधी यांचे नोटिसीला उत्तर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून प्राथमिक उत्तर प्राप्त झाले आहे. परंतु तपास पुढे नेणारी कोणतीही माहिती त्यांच्याकडून मिळालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. तत्पूर्वी आज दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने भारत जोडो यात्रेदरम्यान उल्लेख केलेल्या लैगिंक छळ पीडितांची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. पुढील 8-10 दिवसांत सविस्तर उत्तर देऊ, असे सांगत राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांना प्राथमिक उत्तर सादर केले आहे. या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, जर सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारची यात्रा काढली असती तर त्यांनाही अशाचप्रकारचे प्रश्न तुम्ही विचारले असते का?
16 मार्चला नोटीस पाठवली होती : श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी दिलेले एक विधान दिले होते, ज्यामध्ये ते महिलांसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगत होते. भारत जोडो यात्रेदरम्यान मला बलात्कार आणि शोषण झालेल्या अनेक महिला आढळल्या, असे ते म्हणाले होते. दिल्ली पोलिसांनी त्यांना 16 मार्चला एक नोटीस पाठवली होती. या नोटीसद्वारे पोलिसांनी राहुल गांधींना त्या सर्व महिलांची माहिती देण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते या प्रकरणी कारवाई करू शकतील.
भारत जोडो यात्रेदरम्यान विधान : स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा म्हणाले की, आम्ही राहुल गांधींशी बोलण्यासाठी आलो आहोत. 30 जानेवारी रोजी राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये विधान केले होते की, भारत जोडो यात्रेदरम्यान ते अनेक महिलांना भेटले होते ज्यांनी त्यांना त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले होते. पीडितांना न्याय मिळावा यासाठी आम्ही त्यांच्याकडून तपशील मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.