नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर सीबीआयने त्यांना आज दुपारी दोन वाजता राऊस अव्हेन्यू कोर्टातील विशेष सीबीआय न्यायाधीश एम के नागपाल यांच्या न्यायालयात हजर केले. यानंतर आता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. ईडी प्रकरणातही त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 29 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
अन्य आरोपींच्या कोठडीतही वाढ : मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य आरोपी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीतही न्यायालयाने वाढ केली आहे. ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात अरुण पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीत 29 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिसोदिया जेव्हा सुनावणीसाठी कोर्टात पोहोचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते.
अरविंद केजरीवाल यांची काल साडेनऊ तास चौकशी :दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणीकाल सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यांना या प्रकरणी तब्बल 56 प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मी सीबीआयने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच हे प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.