नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी शनिवारी भाजपवर निशाणा साधला आहे. त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, 'भाजपचे लोक कालपासून आप नेते मनीष सिसोदिया यांच्याविरोधात खोट्या बातम्या पसरवत आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मनीष सिसोदिया यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मनीष सिसोदिया आणि त्यांच्या पत्नीची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियापासून वृत्तवाहिन्यांपर्यंत पसरवल्या जात आहेत'.
'सिसोदियांनी स्वतःच्या कमाईने घर घेतले' : आतिशी यांनी ईडीचा आदेश दाखवला आणि सांगितले की, 'ईडीने आपल्या आदेशात पंतप्रधान मोदींचे खोटे उघड केले आहे. ईडीची ही कागदपत्रे वाचली तर कळते की 81,49,738 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया 2005 मध्ये पत्रकार असताना त्यांनी स्वतःच्या कमाईने हे घर घेतले होते. तेव्हा ते राजकारणात नव्हते. अबकारी धोरणाच्या कमाईतून हे घर कसे बांधले, हे भाजपने सांगावे', असे त्या म्हणाल्या.
'आम्ही सीबीआय आणि ईडीला घाबरत नाही' :आतिशी म्हणाल्या की, 'भाजप आणि मोदींना मनीष सिसोदियांना बदनाम करायचे आहे. मनीष सिसोदिया दिल्लीतील लाखो गरीब मुलांचे भविष्य घडवत आहेत, हे त्यांना सहन होत नाही. त्यांना मनीष सिसोदियांना सीबीआय-ईडीची इतकी भीती दाखवायची आहे की ते अखेरीस भाजपमध्ये सामील होतील. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही सीबीआय आणि ईडीला बिलकूल घाबरत नाही'.