राजधानी दिल्लीला पुन्हा पुराचा धोका नवी दिल्ली :यमुना नदीने धोक्याची पातळी गाठल्याने दिल्लीला पुराचा पुन्हा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच दिल्लीत आलेल्या पुराने हाहाकार उडाला होता. अनेक नागरिकांची घरे पाण्याखाली गेल्यामुळे चांगलेच राजकारण तापले होते. आता पुन्हा यमुना नदीने धोक्याची पातळी गाठल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत. दिल्लीत यमुना नदीची पाणी पातळी धोक्याच्या 205.33 मीटरवर गेली आहे. मंगळवारी रात्री जुन्या लोखंडी पुलावर पाणी पातळी 205.39 मीटर नोंदविण्यात आली आहे.
हथिनी कुंडामधून सोडण्यात आले पाणी :काही दिवसांपूर्वी हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनीकुंड या प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आल्यामुळे दिल्लीत पूर आला होता. आता पुन्हा हरियाणातील पहाडी प्रदेशात जोरदार पाऊस झाल्यामुळे हथिनी कुंडातून पाणी सोडण्यात येत आहे. हथिनी कुंडातून मंगळवारी सकाळी 75 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. 26 जुलैनंतर हा पाण्याच्या प्रहावाचा सर्वाधिक वेग आहे. त्यामुळे यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
हरियाणातील पाण्यामुळे दिल्लीत पूर :यमुना नदीत हरियाणा राज्यातील हथिनीकुंड या प्रकल्पातील पाणी सोडण्यात येते. त्यामुळे 13 जुलैला दिल्लीत मोठा पूर आला होता. 13 जुलैला दिल्लीत यमुना नदीची पाणी पातळी 208.66 मीटर इतकी उच्चांकी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे यमुना नदीच्या पाणी पातळीने आजपर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढले होते. यमुना नदीच्या पुरामुळे दिल्लीतील खादर परिसरात राहणाऱ्या 40 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते.
पुरानंतर दिल्लीत तापले राजकारण :दिल्लीत नुकताच भयंकर पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर दिल्लीत मोठे राजकारण तापले होते. हरियाणा राज्यातील हथिनीकुंडातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दिल्लीत पूर येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. तर दिल्लीत कोणतेच काम केले नसल्यामुळे पाणी साचल्याचा आरोप भाजपाच्यावतीने करण्यात आला होता.
हेही वाचा -
- Delhi Flood : यमुना नदीच्या पाणी पातळीने तोडले सगळे रेकॉर्ड; झाडावर २२ तास अडकलेल्या तरुणाची थरारक सुटका