नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील शास्त्री पार्क पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी हत्येप्रकरणी महिलेसह दोन आरोपींना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण : प्रकरण असे आहे की, पतीच्या मृत्यूनंतर महिलेच्या नातलगाने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. यामुळे व्यथित झालेल्या महिलेने मैत्रीणीच्या पतीच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेली आरोपी महिला उत्तर प्रदेशातील बदायूं येथील रहिवासी आहे. तर तिचा साथीदार इरफान हा शास्त्री पार्क दिल्लीचा रहिवासी आहे.
धारदार शस्त्राने हत्या केली : पोलिसांना रविवारी सकाळी साडेआठ वाजता शास्त्री पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील बेला फार्म हाऊसजवळ एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. मृताच्या अंगावर शर्ट नव्हता तर मानेवर व पोटावर खोल जखमेच्या खुणा होत्या. मृतदेहाजवळ अशी कोणतीही वस्तू सापडली नाही ज्यामुळे त्याची ओळख पटू शकेल. मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याद्वारे संशयित आरोपी आणि मृत दोघांची ओळख पटली. 20 वर्षीय अबुजर असे मृताचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील कासगंज येथील रहिवासी आहे.