नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊज एव्हन्यू न्यायालयाने सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 7 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर आज न्याय मिळाला. शशी थरूर यांना पहिल्यापासूनच न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, असे निकालानंतर थरूर यांचे वकिल विकास पहवा म्हणाले.
सुनंदा पुष्कर यांचा 17 जानेवारी 2014 साली हॉटेलमध्ये संशयितरित्या मृतदेह सापडला होता. सरकारी बंगल्याचे नुतनीकरण चालू असल्याने सुनंदा पुष्कर आणि शशी थरुर दोघे हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री असलेल्या शशी थरुर यांच्यावर भारतीय दंड संहिता 498-ए आणि 306 नुसार गुन्हा दाखल झाला होता.