मुंबई - दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी (IPL-2022)च्या सामन्यात माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव केला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावा केल्या. दिल्लीने 18.1 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. ( RR vs DC ) या विजयासह दिल्लीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अबाधित राहिल्या असून, राजस्थानही या शर्यतीत कायम आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने सामन्यानंतर सांगितले की, त्याच्या संघाने 15-20 धावा कमी केल्या आणि नंतर झेलही सोडले, त्यामुळे पराभव स्वीकारावा लागला.
मिचेल मार्शने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने 62 चेंडूत 89 धावांची खेळी खेळली ज्यात 5 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याचवेळी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 41 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 52 धावा करून परतला. ( RR vs DC IPL 2022 ) मार्श आणि वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्ससाठी क्रमांक-3वर फलंदाजी करताना रविचंद्रन अश्विनने अर्धशतक केले. त्याने 38 चेंडूत 50 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
सामन्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, आम्ही काही धावा कमी करू शकलो आणि नंतर मध्येच काही विकेट घेऊ शकलो नाही. आम्ही फलंदाजी करत असताना विकेटवर गती होती. आम्ही 15-20 धावा कमी होतो. मग क्षेत्ररक्षणही खराब झाले आणि आम्ही काही महत्त्वाचे झेल सोडले. खरंच निराश झालो, पण पुढच्या सामन्यात आम्ही पुनरागमन करू इच्छितो.