नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमधील प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, (CAQM) द्वारे ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजधानीत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) शुक्रवारी सकाळी 6 वाजता 460 नोंदवण्यात आला. गुरुवारी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 407 नोंदविण्यात आला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी पाहता दिल्लीसह संपूर्ण एनसीआर हा गॅस चेंबर झाल्यासारखी स्थिती आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील बहुतांश भागात AQI 450 पेक्षा जास्त नोंदवण्यात आल्यानं दिवसेंदिवस प्रदूषण वाढल्याचं स्पष्ट झालं. अशा परिस्थितीत लोकांनी मास्क लावावा लागणार आहे. वाढलेल्या प्रदुषणाची स्थिती पाहता अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
तापमानात घट, वाऱ्याचा कमी वेग, खराब रस्त्यांमुळे उडणारी धूळ, कचरा जाळणे अशा विविध कारणांमुळे दिल्लीमध्ये प्रदूषण वाढले आहे. दिल्ली-एनसीआरमधील वाढते वायू प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक असल्यानं काळजी घेण्याचा डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. प्रदूषणामुळे हृदयरोगी आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती व धोका असतो. अशा परिस्थितीत संरक्षणाची गरज आहे. लोकांना धूळ आणि धुराच्या संपर्कात येण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जास्त प्रदूषण असलेल्या भागात जाऊ नका. सकाळी फिरायला जाऊ नका आणि बाहेर जाताना मास्क लावा.
- दिल्लीतील वायू प्रदूषणाबाबत, सर गंगा राम हॉस्पिटलचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. धीरेन गुप्ता म्हणाले, प्रदुषणाचा सर्वाधिक दुष्परिणाम लहान मुलांवर होता. गर्भवती महिलांच्या अर्भकाला एलर्जी होते. सध्या, दिल्लीत प्रत्येक रस्ता हा स्मोकिंग झोनसारखा आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना एन ९५ मास्क घालावा. प्रदूषणाला हातभार होईल, असे कोणतेही कृत्य करू नका.
- माया शर्मा नावाची महिला म्हणाली, माझा मुलगा शाळेत जात असताना धुकं वाढत चाललेलं दिसतंय. शाळा बंद करण्याबाबत सरकारकडून अजून कोणतीही सूचना आलेली नाही. मी मुलाला मास्क लावून शाळेत पाठविते. प्रदुषणात श्वास घेणं थोडे कठीण झाले. अशा परिस्थिती ऑनलाइन वर्ग सुरू झाले, तर मुले आजारी पडणार नाहीत.
हेही वाचा-
- Air Pollution In Mumbai : मुंबईतील हवेचा दर्जा घसरल्यानं सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस
- Mumbai Air Pollution : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेची 27 मार्गदर्शक तत्वे, नियम मोडल्यास होणार कारवाई