नवी दिल्ली :दिल्लीत बुधवारी ( दि.8 तारखेला ) मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरात हायस्पीड थारने रस्त्यावरील फेरीवाले आणि विक्रेत्यांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.
मलाई मंदिराजवळची घटना : वसंत विहार येथील मलाई मंदिराजवळ ही घटना घडली. भरधाव वेगात आलेल्या थारने दुकानदारांना चिरडले. दोन कारला धडक दिली. यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांनी सगळी घटना डोळ्यांनी पाहीली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन कारचेही नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण समोर आले आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात होताच आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबतच नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.