नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दीप सिधूला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर आंदोलकांनी धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यास दीप सिधू जबाबदार असल्याचा आरोप आहे. २६ जानेवारीनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर १ लाख इनाम ठेवला होता. सुमारे १५ दिवसानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
लाल किल्ल्यावर हिंसाचाराचा आरोप -
लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ताबा मिळवला तेव्हा दीप सिधूने फेसबुक लाईव्हही केले होते. त्यानंतर त्याचे नाव चर्चेत आले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दीप सिधूला ताब्यात घेतले आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. नियोजित मार्गावरून ट्रॅक्टर रॅली सुरू होती. मात्र, दीप सिधूने भडकावल्याने आंदोलकांनी लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला. लाल किल्ल्यावर आंदोलक जाण्यास दीप सिधूच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब हा धार्मिक ध्वज फडकावला होता. या आंदोलकांच्या घोळक्यात दीप सिधूही होता.