नवी दिल्ली/नोएडा : प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता अमित भडाना याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अमित भडाना दिल्लीच्या मुखर्जीनगरमध्ये आगामी व्हिडिओचे शूटिंग करत होता. त्यादरम्यान आरोपी तिथे पोहोचला आणि त्याने भडानाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉलद्वारेही धमकी देण्यात आली. या प्रकरणी नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
७ ऑगस्ट रोजी धमकी मिळाली : अमित भडाना याला ७ ऑगस्ट रोजी धमकी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर त्याचा भाऊ सुधीर भडाना याने सेक्टर ४९ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फोन करणार्याने अमित भडाना याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले. या सोबतच आरोपीने मोबाईलवर पाठवलेल्या मेसेजमध्ये त्याला अमितच्या घराचा आणि कार्यालयाचा पत्ता माहीत असल्याचे सांगितले.
परस्पर वैमनस्यातून धमकी मिळाल्याची शक्यता : याप्रकरणी एसीपी सौम्या सिंह यांनी सांगितले की, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स, मॅन्युअल आणि सायबर सेलचीही मदत घेतली जात आहे. परस्पर वैमनस्यातून कोणीतरी हा प्रकार केल्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या. सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करून प्रकरणाचा खुलासा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यूट्यूबवर २४ मिलीयनहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत : २८ वर्षीय अमित भडाना हा एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आहेत. त्याचे यूट्यूबवर तब्बल २४ मिलीयनहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. विशेष म्हणजे, यूट्यूबवर २० मिलीयन सबस्क्राइबर्सची संख्या गाठणारा तो पहिला भारतीय यूट्यूबर आहे. यासोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही त्याची फॅन फॉलोइंग लाखोंच्या संख्येने आहे. त्याने अपलोड केलेला जवळपास प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत असतो. या व्हिडिओंना कोटींच्या घरात व्ह्यूज मिळतात.
हेही वाचा :
- Jawan Clips Leaked : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामधील व्हिडिओ क्लिप लीक; प्रॉडक्शन हाऊसने मुंबई पोलिसांकडे केली तक्रार...
- Bigg Boss OTT 2 finale : अंतिम फेरीपूर्वी अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल, चाहत्यांची काळजी वाढली
- Ankita Lokhande Father Death : अंकिता लोखंडेच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर...