बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायलयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कॉलरने पाकिस्तानमधील एका बॅंक खात्यात पैशांची मागणी केली आहे. त्यामुळे सायबर पोलिसांसह संपूर्ण पोलीस खाते अलर्ट झाले आहे.
अज्ञात संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या प्रेस रिलेशन ऑफिसरने एक तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी स्वत:सह अनेक न्यायाधीशांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले. के मुरलीधर यांनी 14 जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यांना 12 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मेसेज आले होते. हा त्यांचा अधिकृत फोन नंबर असून हा नंबर उच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे.
या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी : हा संदेश हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत आहे. संदेशात मुरलीधर यांच्यासह न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, न्यायमूर्ती एच टी नरेंद्र प्रसाद, न्यायमूर्ती अशोक जी निजगन्नावार (निवृत्त), न्यायमूर्ती एचपी संदेश, न्यायमूर्ती के नटराजन आणि न्यायमूर्ती बी वीरप्पा (निवृत्त) या उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.