संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत, असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्र-कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ला इ.स. ११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला. नरहरी यांच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार होते, असे म्हटले जाते. संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी होते. संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार झाले, असे सांगितले जाते. हा मुलगा हरि (विठ्ठल) व हराचा (शंकर) समन्वय साधणारा थोर संत होईल, याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो शिवभक्त असला, तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध होईल, असा आशीर्वाद चांगदेव महाजांनीच नरहरी सोनार यांना दिला होता.
विठ्ठलमय शिव उपासक : पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगलीच प्रसिद्ध होती. नरहरी सोनार प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असत, ज्योतिर्लिंगावर बेलपत्र वाहीत. कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची विशेष श्रद्धा नव्हती.
कसे झाले विठ्ठल भक्त : एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी नरहरी यांनी सोन्याची साखळी बनवली. विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली. मात्र, ती एक वीत जास्त झाली. सावकाराने आपल्या सेवकाला नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. दुरुस्त करून दिलेली साखळी विठ्ठलाला अर्पण केल्यावर ते माप पुन्हा एकदा जास्त झाल्याचे दिसून आले. या प्रसंगामुळे नरहरी सोनार चांगलेच गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे का होतेय, या विचाराने त्यांना ग्रासून टाकले. अखेर स्वतः मंदिरात जाऊन माप घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, मंदिरात प्रवेश करताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले. सोनसाखळी विठ्ठलाच्या कमरेला बांधत असताना, त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले असता, त्यांना शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलच होता. नरहरी सोनार यांनी पुन्हा एकदा डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तोच प्रकार घडला. अखेर प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की, पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत.
माघ कृष्ण तृतीयेला पुण्यतिथी महोत्सव : नरहरी सोनारांच्या नावावर फार ६३ अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई', 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा', माझे प्रेम तुझे पायी', आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' हे अभंग विशेष प्रसिद्ध आहेत. समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरा समोर महाद्वारात मल्लीकार्जुन मंदिरा शेजारी आहे. सर्वात वयोवृद्ध संत म्हणून नरहरी महाराजांना पाहील जाते. अंतसमयासी ते ९२ वर्षाचे होते. माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो. सर्व शाखीय सुवर्णकार समाज भक्ती भावाने पुजन व उत्सव साजरा करतो.