नवी दिल्ली Dearness Allowance : मोदी सरकारनं दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर पोहोचला आहे. पूर्वी तो ४२ टक्के होता. मोदी सरकारच्या या निर्णयाचा लाभ सुमारे ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.
पेन्शनधारकांनाही वाढीव पेन्शन मिळणार : मोदी सरकारनं बुधवारी (१८ ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मंजूर करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या पगारात महागाई भत्ता जोडला जाणार आहे. त्याचबरोबर पेन्शनधारकांनाही या महिन्यात वाढीव पेन्शन मिळणार आहे. तसेच जुलै ते सप्टेंबरपर्यंतची थकबाकीही दिली जाऊ शकते, अशीही माहिती मिळाली आहे.
दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी : ऑक्टोबर महिन्यापासून सण सुरू होतात. २४ ऑक्टोबरला दसरा आहे. तर पुढील महिन्यात १२ नोव्हेंबरला दिवाळी आहे. या सणांपूर्वी मोदी सरकारनं ही मोठी भेट दिली. यापूर्वी केंद्र सरकारसाठी महागाईच्या बाबतीत दिलासा देणारी बातमी आली होती. अन्नधान्याच्या महागाई दरात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. त्याचवेळी सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दरात पाच टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसलाही मंजुरी : केंद्र सरकारनं १ जुलै २०२३ पासून हा महागाई भत्ता लागू केला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. या आधी २४ मार्च रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. तेव्हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळानं सर्व निर्णयांना मंजुरी दिली आहे. यासह मंत्रिमंडळानं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसलाही मंजुरी दिली. तसेच गव्हाच्या आधारभूत किंमतीतही सुमारे १५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Diwali Bonus २०२३ : सरकारी कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी; चारचाकी घेण्यासाठी मिळणार पंधरा लाख