कोलकाता: एका मजुराच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. विषेष म्हणजे या मजुराला त्याच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती नव्हती. नसीरुल्ला मंडल असे त्या 100 कोटी रुपये खात्यात जमा झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर या मजुराला त्याच्या खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती मिळाली. मात्र एकीकडे 100 कोटी रुपये जमा झाल्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यामुळे या मजुराची सध्या पाचात धारण बसली आहे.
पोलिसांनी नोटीस बजावल्याने उघड झाली घटना :पश्चिम बंगालमधील देगंगा येथे राहणारे रोजंदारी मजूर नसीरुल्ला मंडल यांना सायबर क्राईमकडून नोटीस मिळाली आहे. या नोटीसमध्ये त्यांना त्यांच्या खात्यात शंभर कोटी रुपये कोठून आले हे सांगण्यास सांगितले आहे. या घटनेतील विशेष म्हणजे नोटीस येण्यापूर्वी नसिरुल्ला मंडल यांनाही त्यांच्या खात्यात १०० कोटी रुपये असल्याची माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर नसीरुल्ला यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मजुरीवर चालते सहा जणांचे कुटूंब :नसिरुल्ला मंडल हा देगंगा येथील चौराशी पंचायतीच्या वासुदेवपूर गावचा रहिवासी आहे. तो रोजंदारी मजुरी करून ते सहा जणांचे कुटुंब चालवतो. नसिरुल्ला मंडल याने सरकारी बँकेत खाते उघडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र हे खाते सायबर क्राइम विभागाच्या आदेशानुसार आधीच गोठवण्यात आले आहे. नसिरुल्ला मंडल याने त्याच्या बँक खात्यात कधीच हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये ठेवले नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.