नवी दिल्ली :बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात अती तीव्र चक्रीवादळात (VSCS) रुपांतरीत होत आहे. Biparjoy Storm बिपरजॉय चक्रीवादळ सध्या 195 किमीच्या वेगाने घोंगावत पुढे सरकत आहे. पुढील काही तासात त्याचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी एक अतिशय तीव्र चक्रीवादळ म्हणून पाकिस्तान आणि भारतातील गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे गुजरातला पावसाने दणका दिला आहे. तर पाकीस्तानात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता :येत्या काही तासात हे वादळ मुंबईच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 600 किमी, पोरबंदरपासून 530 किमी दक्षिण-नैऋत्य, द्वारकापासून 580 किमी दक्षिणेकडे, नलियापासून 670 किमी अंतरावर दक्षिण-नैऋत्य दिशेला असणार असून कराचीच्या दक्षिणेस 830 किमी असणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार ते अतिशय तीव्र चक्री वादळाच्या रूपात समुद्र किनारपट्टीला वेगाने धडकण्याची शक्यता आहे. 15 जूनच्या दुपारच्या सुमारास ते उत्तरेकडे सरकून पाकिस्तान, सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
बिपरजॉय वळले पूर्वेकडे, गुजरातला पावसाचा दणका दिला :अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयच्या मार्गात झालेल्या बदलामुळे ते गुजरात किनारपट्टीच्या जवळ आले आहे. बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ते पूर्वेकडे वळल्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ पोरबंदरपासून 200-300 किमी पुढे जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 24 तासात चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसात चक्रीवादळ हळूहळू उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या किती असेल वादळाचा वेग :मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी राज्य प्रशासनाने किनारपट्टीवर तयारी केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठिकाणे काढून टाकण्यात आले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अनेक तुकड्या किनाऱ्यावर तैनात करण्यात आल्या आहेत. IMD च्या अंदाजानुसार 11 जून रोजी या वादळाचा वेग 40-50 किमी प्रतितास वरून 60-65 किमी प्रतितासपर्यंत वाढू शकतो. त्याचवेळी 12 जून रोजी आणि त्याचा वेग 50-60 किमी प्रतितास असू शकतो. 13 ते 15 जूनपर्यंत 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. या दरम्यान समुद्र खूप अस्थिर असण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये पावसाची शक्यता :11 आणि 12 जून रोजी दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 आणि 14 जून रोजी राज्याच्या सर्वच भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण होते आणि सोसाट्याचा वारा होता.
पाकिस्तानमध्ये 'रेड अलर्ट' जारी :कराची पोर्ट ट्रस्टने (KPT) 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पाकिस्तानस्थित वृत्तसंस्थेने बिपरजॉय चक्रीवादळ सध्या कराचीच्या दक्षिणेस सुमारे 900 किमी अंतरावर असल्याचे वृत्त दिले आहे. त्यामुळे कराची पोर्ट ट्रस्टने व्हीएससीएस बिपरजॉयमुळे जहाजे आणि बंदर सुविधांच्या सुरक्षेसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. वादळ शांत होईपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचे केपीटीने जाहीर केले आहे.
शिपिंग राहणार बंद :कराची पोर्ट ट्रस्टने 25 नॉट्सपेक्षा जास्त जोरदार वारे वाहत असल्यास शिपिंग बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. जर वाऱ्याचा वेग 35 नॉट्सपेक्षा जास्त असेल तर मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प राहील. कराची पोर्ट ट्रस्टने जहाजांशी संपर्क साधण्यासाठी दोन आपत्कालीन फ्रिक्वेन्सी देखील जारी केल्या आहेत. ट्रस्टने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वादळाचा प्रभाव पाहता रात्री जहाजांची वाहतूक ठप्प राहील. हार्बर क्राफ्ट चौकीतील सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देशही ट्रस्टने अधिकाऱ्यांना दिले आहेत.