रायपूर - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी एका जवानाला ओलीस ठेवल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जवान हा जम्मू काश्मीरमधील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जवानाच्या सुटकेच मागणी केली आहे.
ओलीस ठेवलेल्या जवानाचे नाव राकेश्वर सिंह मनहास आहे. राकेश्वर सिंह मनहास हे कोब्रा बटालियनमध्ये होते. राकेश्वर सिंह मनहास यांना एक वर्षाची मुलगी आहे. गेल्या दहा वर्षांपासून राकेश्वर सुरक्षा दलात आहेत. जवानाच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पतीच्या सुटकेची मागणी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्तीसगडमध्ये असणार आहेत. बीजापूर येथे झालेल्या चकमकीच्या ठिकाणाची ते पाहणी करतील. तसेच, जखमी जवानांनाही ते भेट देणार आहेत.