सोनीपत/मुंबई Crime News : मुंबईतील १२ जणांनी मिळून हरियाणातील सोनीपत येथील एका ड्रग्ज विक्रेत्याची तब्बल १२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. ड्रग्ज विक्रेत्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सोनीपत पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या १२ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. सोनीपत पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी पुढील तपास करत आहे.
वरळी इमारत प्रकल्प देण्याच्या बहाण्यानं फसवणूक :मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या काही लोकांनी सोनीपत येथील पावेल गर्ग या ड्रग्ज विक्रेत्याशी संपर्क साधला. त्यांनी गर्ग यांना मुंबईतील वरळी या पॉश भागात एक इमारत प्रकल्प देण्याच्या बहाण्यानं त्यांच्याकडून टप्याटप्यात १२७ कोटी रुपये घेतले. काही काळानंतर व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार सोनीपत पोलिसांकडे केली. पावेल गर्ग यांच्या तक्रारीवरून सोनीपत सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात कलम ४०३, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.