हैदराबाद - पीफाईझर नंतर अमेरिकेतील दुसरी औषधनिर्मिती कंपनी मोडर्ना ही देखील तिच्या कोरोना लसीच्या लेट-स्टेज टेस्टींगचे पहिले अंतरिम विश्लेषण लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. मोडर्नाची लस ही पीफाईझर सारख्याच एमआरएनए तंत्रज्ञानावर काम करते. त्यामुळे, पीफाईझर प्रमाणे ती देखील कोरोनावर प्रभावी ठरेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
जगात १५० पेक्षा अधिक कोविड १९ लसींची निर्मिती सुरू आहे. त्यातील ४४ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू आहे, तर ११ लसींचे लेट-स्टेज टेस्टींग सुरू आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ८८ लाख १४ हजार ५७९ इतकी आहे. यातील ८२ लाख ५ हजार ७२८ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. देशात ४ लाख ७९ हजार २१६ अॅक्टिव्ह रुग्ण असून १ लाख २९ हजार ६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला दिलासा देणारी बातमी आहे. काल राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात केवळ २ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. दिवसभरात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील मंदिरे उघडण्यात येणार आहेत.