हैदराबाद : महिलेची प्रसूती करताना शस्त्रक्रियेच्यावेळी पोटात कापूस राहिल्यानं महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तेलगांणातील आचमपेटमधील दर्शनगड तांड्यातील महिलेसोबत घडली. रामावत रोजा ( वय 27 ) असं त्या पोटात कापूस राहिल्यानं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. रामावत रोजा यांना आचमपेट येथील सरकारी रुग्णालयात 15 ऑगस्टला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉ. कृष्णा यांनी रामावत रोजा यांच्यावर सिझरची शस्त्रक्रिया केल्यानं त्यांनी बाळाला जन्म दिला होता. मात्र रुग्णालयातून सुटी देण्यात आल्यानंतर रामावत यांच्या पोटात वेदना होत होत्या.
घरी गेल्यानंतर सुरू झाला रक्तस्त्राव :रुग्णालयातून घरी गेल्यानंतर महिलेला पोटात वेदना होऊन रक्तस्त्राव झाला. त्यानंतर पोटात जास्त वेदना होत राहिल्यानं रामावत रोजा यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यावेळी डॉक्टरांनी रामावत रोजा यांना डॉ कृष्णा चालवत असलेल्या खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे रोमावत रोजा यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र संध्याकाळपर्यंत थांबवून त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगण्यात आलं.
पोटात कापूस राहिल्यानं मृत्यू :डॉ. कृष्णा चालवत असलेल्या खासगी रुग्णालयातही रामावत रोजा यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र कोणताच फरक न पडल्यानं रामावत रोजा यांचे नातेवाईक संतप्त झाले. त्यामुळे रामावत रोजा यांना हैदराबादेतील रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांचा हैदराबादेतील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रसूतीनंतर पोटात कापूस राहिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला.
मृतदेहासह नातेवाईकांचं आंदोलन :प्रसूतीसाठी सिझरची शस्त्रक्रिया करताना पोटात कापूस राहिल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावेळी नातेवाईकांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. कृष्णा यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर रामावत रोजा यांच्या पतीनं डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन डॉ. कृष्णा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोवर्धन यांनी दिली.
आरोग्य मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश :संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेऊन सरकारी रुग्णालयासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वैद्यकीय आयुक्त डॉ. अजय कुमार यांनी दोषीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. मात्र संतप्त नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं शेवटी आरोग्य मंत्री हरीश राव यांनी हस्तक्षेप करत याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय आयुक्तांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू करण्यात आल्याची माहितीही अजय कुमार यांनी दिली आहे.