नवी दिल्ली - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ब्रिटनवरून येणाऱ्या सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ब्रिटनवरून दिल्ली विमानतळावर उतरलेले पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेले होते. त्यांना पकडण्यात आले आहे.
कोरोना चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर हे पाचजण फरार झाले होते. यातील एक महिला दिल्लीतून रेल्वेने आंध्रप्रदेशात गेली. तर दुसरा एक रुग्ण पंजाबातील लुधियानात गेला. इतर तीन रुग्ण दिल्लीजवळील परिसरात गेले होते. त्यांचा आता पत्ता लागला आहे.
केंद्र सरकारने व्यक्त केली नाराजी -
ब्रिटनवरून आलेले पाच रुग्ण फरार झाल्यानंतर दिल्ली प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यांचा पत्ता लागला आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर नाराजी व्यक्त केली आहे. नव्या विषाणूची भीती असताना प्रशासन सतर्क झाले आहे. थोडीशीही चूक सर्व प्रयत्नांना निष्फळ करू शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हणत चिंता व्यक्त केली आहे.
मंगळवारी रात्री हे सर्व प्रवासी दिल्लीत आले होते. कोरोना चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर त्यांना तेथेच थांबण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यातील पाच जण पळून गेले. कोरोनाचा नवा विषाणू आल्याने ही खबरदारी बाळगण्यात येत आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना कोरोनाच्या कोणत्या विषाणूची लागण झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कोरोनाचा नवा विषाणू जून्या विषाणूपेक्षाी जास्त घातक असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.