अमेठी (उत्तरप्रदेश ) : केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी जोश इराणी यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत ( Controversial posters against Smriti Irani and her daughter ) आहेत. हे पोस्टर्स अमेठीमध्ये चिकटवण्यात आले असून, पोस्टरमध्ये केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलीविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये प्रकाशक म्हणून 'अमेठीचे लोक' असे लिहिले आहे. ( poster controvery in amethi )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टर्सच्या वरच्या बाजूला 'स्मृती इराणी मुर्दाबाद' असे लिहिले आहे. याशिवाय स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात अवैध परवाना घेऊन बार चालवल्याचा आरोप आहे. पोस्टरमध्ये इराणी यांचा राजीनामाही मागितला आहे. स्मृती इराणी दोन दिवसांनी अमेठीला भेट देत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी वादग्रस्त पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्टर्स कोणी लावली याचा पोलीस तपास करत आहेत.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनोद कुमार पांडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलीच्या विरोधात पोस्टर लावल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. मात्र, स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांनी आपल्या मुलीवर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. स्मृती इराणी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीला आज शिक्षा होत आहे कारण तिच्या आईने 2014 आणि 2019 मध्ये अमेठीतून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवली होती.