नवी दिल्ली -किमान आधारभूत किमतीवर म्हणजेच एमएसपीवर कायदा करण्याची गरज खुद्द पंतप्रधान मोदींनीही मान्य केली आहे. मात्र, तरीही मोदी स्वत:चेच ऐकत नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर केला. मोदींनी आज (शुक्रवार) मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस मतांचे राजकारण करत असल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला होता. त्याला काँग्रेसने पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे.
सरकार हमीभाव देऊ शकत नाही, भाजपने दिले प्रतिज्ञापत्र -
रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी भाजप नेत्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत टीका केली. तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले होते, सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही. भाजप सरकार शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देईल अशी घोषणा भाजपाने केली होती. मात्र, त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले की, सरकार एवढा हमीभाव देऊ शकत नाही. काँग्रेस सरकारने ७२ हजार कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र, मोदींनी फक्त उद्योजकांचे कर्ज माफ केले. निरव मोदी, विजय मोदी यांचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांचे नाही.