नवी दिल्ली :देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीचा मुद्दा आता तापणार असं दिसतंय. या प्रकरणाबाबत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात दिल्लीतील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आल्या. एक तक्रार दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये तर दुसरी तक्रार न्यू पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण :लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर सोमवारी विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ खासदारांचा समावेश आहे. यानंतर निलंबित खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शनं केली. निदर्शनादरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली. कल्याण बॅनर्जी धनखड यांची मिमिक्री करत होते, तर काँग्रेस नेते राहुल गांधी तिथे उभे राहून त्यांचा व्हिडिओ बनवत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे.