नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आसमान गाठल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच आग लागली आहे. दुसरीकडे घरगुती गॅससह व्यावसायिक गॅसच्या किमतीचे दरही गगणाला भिडले होते. मात्र आता सरकारने व्यावसायिक एलपीजीची किमती तब्बल 171.50 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत सोमवारपासून 1856.50 रुपये झाली आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा :तेल वितरण करणाऱ्या कंपन्यांनी व्यावसायिक गॅसची किंमती कमी केल्याचा मोठा फायदा छोट्या व्यावसायिकांना झाला आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपाती केल्याचे हे परिणाम आहेत. एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी तेलाच्या किमती वाढल्यानंतर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 91.50 रुपये प्रति युनिटने कमी केल्या होत्या.
मार्चमध्ये झाली होती मोठी भाववाढ :देशांतर्गत सिलिंडरची किंमत 1 एप्रिलपासून दिल्लीत 2 हजार 028 रुपये होती. तर मार्चमध्ये 2 हजार 119.5 इतकी होती. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) 1 मार्चला घरगुती सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत दिल्लीत 1 हजार 103 रु होती, तर कोलकातामध्ये 1 हजार 129 रु होती. मुंबईत 1 हजार 112.5 आणि चेन्नईमध्ये 1 हजार 113 रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.