हैदराबाद -येथील भारत बायोटेकच्या कॅम्पसला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) सुरक्षा पुरविली जाणार आहे. शमिरपेट परिसरातील जिनोम व्हॅलीस्थित नोंदणी कार्यालय आणि उत्पादन प्लांट येथे ही सुरक्षा पुरविली जाणार आहे. सुरक्षा दलाचे 64 जवान येथे तैनात केले जाणार आहेत. निरीक्षक स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडून सीआयएस टीमचे नेतृत्व केले जाणार आहे. 14 जूनपासून ही सुरक्षा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती सीआयएसचे उपमहानिरीक्षक आणि मुख्य प्रवक्ते अनिल पांडे यांनी माध्यमांना दिली.
दहशतवादी हल्ल्याचा धोका -
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नुकतेच भारत बायोटेकला सीआयएसएफ सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मंजूरी देण्यात आली आहे. माहितीनुसार, वैद्यकीय आणि आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टीने भारत बायोटेक ही देशातील एक महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेला दहशतवादाचा धोका दर्शविला जात आहे. या पार्श्वभूमीवर, हैदराबादमधील भारत बायोटेकच्या कॅम्पसला सीआयएसएफची सुरक्षा पुरविली जाणार आहे.