लडाख : लडाखमधून चीनच्या उचापतींचा नवा प्रकार समोर आला आहे. लडाखमधील एका नगरसेवकाने दावा केला आहे की, चीन भारतीय सीमेजवळ वेगाने सुविधा विकसित करत आहे. चुशुलमधील नगरसेवक कोन्चोक स्टॅनजिन (Chushul Councillor Konchok Stanzin) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले की, 'पॅंगॉन्ग तलावावरील पूल पूर्ण केल्यानंतर, चीनने गरम पाण्याच्या झऱ्याजवळ 3 मोबाइल टॉवर लावले (Chinese mobile towers near hot springs) आहेत'. ते म्हणाले, 'मला सरकारला आवाहन करायचे आहे की, आपल्याला चीनला उत्तर देण्याची गरज आहे. ते म्हणाले की, चीनने प्रथम नागरीकांसाठी सुविधा निर्माण केल्या आणि नंतर त्या सुविधांचा उपयोग सैन्यासाठी केला आहे. त्यामुळे भारतानेही याभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
आपल्याकडे साधी ४जी सुविधाही नाही : चुशुल, लडाख येथील नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, 'पॅंगॉन्ग लेकवरील पूल पूर्ण केल्यानंतर, चीनने भारतीय भूभागाच्या अगदी जवळ असलेल्या चिनी हॉट स्प्रिंगजवळ 3 मोबाइल टॉवर स्थापित केले आहेत.' ते म्हणाले की, 'ही चिंतेची बाब नाही का? भारतातील आमच्या मानवी वस्तीच्या गावात 4G सुविधाही नाही. माझ्या मतदारसंघातील 11 गावांमध्ये 4G सुविधा नाही. चीनच्या कारवायांना आपण गांभीर्याने घ्यायला हवे', असे ते म्हणाले. भारतातील बहुतांश सीमावर्ती गावांमध्ये 4G इंटरनेट नाही, आपण दळणवळणात मागे आहोत.