श्रीनगर : भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये असंख्य मराठी बांधव फिरण्यासाठी जातात. मात्र त्यांना काश्मीरमध्ये राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता मात्र श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभे राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा मागितली आहे. त्यामुळे नायब राज्यपाल मनोज सिन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीर दौऱ्यावर :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय कौटुंबिक दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांचे शनिवारी जम्मूत आगमन झाले. यावेळी त्यांनी कटरा येथील माता विष्णुदेवी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची श्रीनगरमधील राजभवन येथे भेट घेतली आणि महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जमीन देण्याचे पत्र त्यांना दिले. एकनाथ शिंदे हे आजची रात्र गुलमर्गमध्ये आपल्या कुटुंबासह घालवणार आहेत.
कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरचा विकास :कलम 370 रद्द केल्यापासूनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपाल मनोज सिन्ह यांच्या सक्षम नेतृत्वात काश्मीरमध्ये प्रगती झाली आहे. काश्मीरच्या विकासामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकत्रीकरणाची एक आदर्श संधी निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी हवी जमीन :काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जमीन देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. श्रीनगरमधील महाराष्ट्र भवन हे महाराष्ट्रीयन कला, संस्कृतीसह काश्मीरला भेट देणाऱ्या मराठी नागरिकांना निवास आणि मदत देखील देईल. शिवाय हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि संभाषणांसाठी एक दोलायमान ठिकाण म्हणून काम करेल. विचारांची समृद्ध देवाणघेवाण वाढवेल. काश्मीरमधील महाराष्ट्र भवन हे आमच्या राज्यातील विद्यार्थी, उद्योजक आणि अधिकारी यांच्यासाठी एक केंद्र म्हणून काम करेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून आनंद झाला :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भवन बाधण्यासाठी राज्यपालांकडे जमीन मागतिली. एकनाथ शिंदे यांच्या या पत्रावर राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आनंद झाल्याची माहिती नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे.