भिलाई (छत्तीसगड) Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यापासून उपमुख्यमंत्री टी एस सिंहदेव यांसारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला असेल. मात्र या निवडणुकीत काही असेही उमेदवार आहेत, जे या नेत्यांइतके प्रसिद्ध नाहीत. मात्र ते जे काही कार्य करतात ते कोणालाही करणं शक्य नाही! वैशाली नगर विधानसभेत असाच एक उमेदवार उभा आहे. शंकर लाल साहू असं त्याचं नाव.
शंकर लाल साहू काय काम करतात : शंकर लाल साहू हे मागासवर्गीय समाजातून येतात. वैशाली शहरात क्वचितच कोणी असेल जो त्यांना ओळखत नाही. त्यांचं कामच असं आहे की ते पाहून कोणाचंही हृदय पिळवटून जातं. शंकर लाल साहू यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. तसंच त्यांचा कोणत्याही नेत्याशी संपर्क नाही. ते केवळ त्यांच्या कामाच्या माध्यमातून ओळखले जातात. शंकर लाल साहू गेल्या ३५ वर्षांपासून रामनगर मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्काराचं काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल १ लाख मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
बेवारस मृतदेहांवरही अंत्यसंस्कार : शंकर लाल साहू भिलाई रामनगर मुक्तिधाममध्ये कंत्राटी पद्धतीनं मृतदेह जाळण्याचं काम करतात. कोविडच्या काळात जेव्हा मुक्तिधाममध्ये लोक मृतदेह टाकून पळून जात असत, तेव्हा ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे. त्या काळात शंकर लाल यांनी अशा सुमारे ८० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शंकर लाल सांगतात की, त्यांच्या या कामातही भ्रष्टाचारानं पंख पसरले आहेत. शंकर लाल यांचा पगार केवळ १२ हजार रुपये आहे, मात्र त्यातही कंत्राटदार त्यांना कमिशन मागतो.