रायपूरChhattisgarh CM : विष्णुदेव साय यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. विष्णुदेव साय यांची रविवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. याशिवाय राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. अरुण साव आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आदिवासी समाजाचे नेते : चार वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार राहिलेले विष्णुदेव साय हे आदिवासी समाजातून येतात. गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी रविवारी रायपूरमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचं नाव पुढे केलं होतं. त्यानंतर ५४ नवनिर्वाचित आमदारांनी यावर सहमती दर्शवली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कुनकुरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. येथे त्यांनी ८७,६०४ मतं मिळवून काँग्रेसच्या यूडी मिंज यांचा पराभव केला आहे.
विष्णुदेव साय यांचा राजकीय प्रवास :
- १९९० - बगिया ग्रामपंचायतीचे सरपंच
- १९९० ते १९९८ - तपकरा विधानसभेचे आमदार (अविभाजित मध्य प्रदेश)
- १९९९ - रायगडमधून खासदार म्हणून निवडून आले
- २००४ - रायगडमधून पुन्हा खासदार
- २००६ - छत्तीसगड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
- २००९ - रायगडमधून तिसऱ्यांदा खासदार
- २०११ - दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष
- २०१४ - रायगडमधून चौथ्यांदा खासदार
- २०१४ ते २०१९ - मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री (पोलाद आणि खाण मंत्रालय)
- २०२० ते २०२२ - तिसऱ्यांदा छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष
- २०२२ - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य
- २०२३ - राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य
- २०२३ - कुनकुरी विधानसभेचे आमदार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री