वाराणसी :पद्म विभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. रुग्णालयाने उपचारांदरम्यान दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप त्यानंतर छन्नूलाल आणि कुटुंबीयांनी केला होता. यानंतर याप्रकरणी तपासासाठी जिल्हा प्रशासनाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. मात्र, २० दिवसांनंतरही यातून काहीच माहिती समोर आली नसल्याचे छन्नूलाल यांनी म्हटले आहे.
२९ एप्रिलला वाराणसीमधील मेडविन रुग्णालयात छ्न्नूलाल यांच्या मुलीचे निधन झाले होते. तिच्या मृत्यूपूर्वी सात दिवस रुग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांना तिला पाहण्याचीही परवानगी दिली नाही, असा आरोप छन्नूलाल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणीही छन्नूलाल यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी छन्नूलाल यांचे कुटुंबीय आणि रुग्णालयातील डॉक्टर यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चाही घडवून आणली होती.